मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे नवे नियम! १ नोव्हेंबरपासून कोणत्या वाहनांना प्रवेश?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे! येत्या १ नोव्हेंबर २०२६ पासून या मार्गावरील वाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून, कोणत्या वाहनांना प्रवेश मिळणार आणि वेगमर्यादा किती असेल, याबाबत महत्त्वाचे नियम निश्चित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, खासगी कार, जीप, एसयूव्ही आणि परवानगी असलेल्या हलक्या मोटार वाहनांना मिसिंग लिंकवरून प्रवास करता येणार आहे. तसेच प्रवासी बस आणि अधिकृत प्रवासी वाहनांनाही प्रवेश मिळणार आहे.
मात्र, सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश बंदी असणार आहे. यामध्ये पिकअप व्हॅन आणि टाटा एससारख्या हलक्या मालवाहू वाहनांचाही समावेश आहे. ज्वलनशील, स्फोटक आणि इतर धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर प्रवेश मिळणार नाही. अशा वाहनांनी जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा वापर करावा.
वेगमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास, खासगी कार आणि हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर, तर प्रवासी बस आणि प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
त्यामुळे मिसिंग लिंकवरून प्रवास करण्यापूर्वी वाहनचालकांनी प्रवेशाचे नियम तपासावेत आणि बोगद्यांमधून जाताना विशेष काळजी घ्यावी.





