“महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अभिवादन सोहळा

Rokhthok Maharashtra 14 0

मुंबई, दि. ३१ मे २०२५ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी माजी आमदार आणि समाजसेवक प्रकाश शेडगे, बालहक्क आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा, शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख दिलीप नाईक, महिला शाखा प्रमुख कविता मल्हार तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महिला म्हणून आणि शिवसेनेच्या नेत्या या नात्याने मला विशेष आनंद होतो की, राज्य सरकारने चौंडी येथे स्मारकासाठी भरीव निधी दिला आहे. मेडिकल कॉलेज व शाळेची उभारणी होणार असून, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही निर्माण होणार आहे.”

“ज्या काळात स्त्रियांना सती जाण्याची प्रथा होती, त्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी निष्पक्ष, समाजहिताचा, न्यायप्रिय आणि आदर्श नेतृत्व दिले. महिला आणि पुरुष दोघांनाही त्यांनी आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात त्यांच्या कार्याचा जागर व्हावा, या हेतूने महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशातही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून शक्य झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपाला त्यांनी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.