1 लाखात मुलगी, 2 लाखात मुलगा! दिल्लीतील बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Rokhthok Maharashtra 2 0

दिल्लीमध्ये नवजात बाळांची खरेदी-विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गरीब कुटुंबांकडून बाळं विकत घेऊन लाखोंमध्ये विक्री करणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी भंडाफोड केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटचं जाळं दिल्लीपासून राजस्थान, गुजरात आणि इतर राज्यांपर्यंत पसरलेलं होतं. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 12 आरोपींना अटक केली असून 5 नवजात बाळांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त रोहित राजवीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने दिलेल्या गुप्त माहितीनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पहाडगंज परिसरात एक महिला वारंवार वेगवेगळ्या नवजात बाळांसह येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयित महिला ज्योती हिची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक बनून ज्योतीशी संपर्क साधला आणि बाळ विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. या व्यवहारासाठी 20 हजार रुपयांत सौदा ठरला.
जेव्हा ज्योती एका फक्त 5 दिवसांच्या नवजात बाळासह घटनास्थळी पोहोचली, तेव्हा पोलिसांनी तिला रंगेहात पकडलं. तिच्यासोबत शालू आणि आणखी एक पुरुषही होता. तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं.
तपासादरम्यान ज्योतीने मोठे खुलासे केले. या रॅकेटमध्ये दिव्या आणि प्रतिभा या महिला गरीब कुटुंबांकडून मुलं मिळवण्याचं काम करत होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी 1 लाख रुपयांत विकत घेऊन 3 ते 4 लाखांत, तर मुलगा 2 लाखांत विकत घेऊन 5 ते 8 लाखांत विकला जात होता.
धक्कादायक बाब म्हणजे काही प्रकरणांत जुळे मुलं नसतानाही जुळी मुलं असल्याचं सांगून फसवणूक केली जात होती. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कालिया याला गुजरातमधून अटक करण्यात आली असून त्याचं काम गरीब कुटुंबांचा शोध घेणं आणि त्यांना या नेटवर्कशी जोडणं होतं.
सध्या पोलिसांचा तपास सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे आणि अटक होण्याची शक्यता आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.