पुणे

“आरंभ सिनीअर सिटीझन होम अँड डे केअर सेंटर – चिमुकल्यांची अनोखी मदत”

माझे वैद्यकिय शिक्षण पूर्ण होण्यापासूनच सामाजिक बांधिलकीची जाण व जाणीव अशा दोन्हीचे बाळकडू घरांतूनच मिळाले होते आणि त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजेष्ठ नागरिकांच्या उर्वरित आयुष्यातील दिवस आनंददायी होण्याकरता मी सुरू केलेले ‘”आरंभ सिनीअर सिटीझन होम अँड डे केअर सेंटर” होय या संपूर्ण सेंटरचे काम चॅरिटीतून म्हणजे निखळ सेवाभावी वृत्तीतून होत आहे व तिची मातृसंस्था आहे “युनिक मेडिकल फॏंडेशन”, पुणे १६. संपूर्णपणे समाजाच्या आरोग्यासाठी समाजानेच चालवलेले हे केंद्र समाजाच्याच आर्थिक शारिरिक व मानसिक आधारावर अवलंबून आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, ते काही खोटे नाही. आपण करत असलेले चांगले काम प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या अनंत चक्षूंनी बघत असतो व त्यानुसार कार्य करत असतो, करून घेत असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रामसेतूल इवल्याशा खारीने सुध्दा तिच्या कुवतीप्रमाणे मदत करीत सत्कार्य केल्याचे आपण जाणतोच तसाच एक अनुभव मान कालपरवा आला आणि मनाला भावला…

संध्याकाळी ओपीडी मध्ये ( दवाखान्यात) पेशंट बघत होतो. तेवढ्यात दोन पेशंट ( श्री आकाश व सौ. निकिता कांबळे) व त्यांची दोन चिमुर्डी मुले ( साई, दुर्वा) माझ्याकडे आली. कपडे सर्वसाधारण,अनवाणी अवस्थेत काउंसलिंग रूम मध्ये विचारून आत आली. दोघांची वय सर्वसाधारण ७ – ८ वर्ष. त्यांच्या हातामध्ये दोन प्लास्टिकच्या पिगी बॅग ( गल्ला) होत्या, त्या माझ्याकडे देत म्हणाले काका या मधील जे काही पैसे आहेत ते तुमच्या “आरंभ” वृद्धाश्रमामधील आज्जी आजोबांसाठी आमच्याकडून छोटीशी भेट. मी त्यांना म्हटले हे तुमचे खाऊकरता साठविलेले पॆसे आहेत ते राहू द्यात त्यातून तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी, खाऊ घ्या. त्यावर ती दोघेही म्हणाली की डॉ. काका आमच्या खाऊपेक्षा या पैशाची आश्रमातील आज्जी आजोबांना जास्त गरज आहे आम्ही परत पैसे साठवू आणी ही प्रेरणा आमच्या अशिक्षित आज्जी (लता रणसिंग) ने आम्हाला दिली आहे. मी हे ऐकून आवाक झालो. त्यांनी मला ती पिगी बॅग ( गल्ला) घेण्यासाठी भाग पाडले. दवाखान्यातून त्या मी घरी घेऊन गेलो व दोन्ही पिगी बॅग उघडल्या तर त्यातून दोघांचे चक्क ८९२/- ₹ निघाले. मला खूप आश्चर्य वाटले.
मी विचार केला सगळ्या गोष्टी पैशाने खरेदी करता येत नाहीत…’मनाची श्रीमंती’ ही अशी गोष्ट ज्याच्याकडे तोच खरा ‘श्रीमंत’…यावरून ही गोष्ट खरी की माणसामध्ये दान द्यायची प्रबळ इच्छा असली पाहिजे. वरील मदत मिळाली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे…या निरागस मुलांच्याकडून समाजाने धडा घ्यावा हीच इच्छा.

“आरंभ” सिनीयर सिटिझन होम ॲण्ड डे केअर सेंटर, वडगाव बुद्रुक, पुणे ४१, संलग्नीत चॅरिटेबल ट्रस्ट “युनिक मेडिकल फॏंडेशन” पुणे १६.
डॉ. सागर लोखंडे ( अध्यक्ष)
९४२१०१५८५६