पुणे

“उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही खोतीदारांना मांजरी उपबाजारात मज्जाव, संचालक मंडळाच्या हुकूमशाही विरोधात 26 जानेवारीपासून आमरण उपोषण

शेतकऱ्यांचा माल न काढण्याचा खोतीदारांचा ठराव…

पुणे (प्रतिनिधी )
मांजरी उपबाजारात खोतीदारांना संचालक मंडळाने दोन महिन्यांपासून मज्जाव केल्याने 15 जानेवारी पासून शेतकऱ्यांचा माल काढण्याचे बंद करण्याचा ठराव खोतीदारांनी केला आहे, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही संचालक मंडळांने खोतीदारांना प्रवेश नाकारल्याने 26 जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा बाळासाहेब भिसे यांनी दिला आहे, या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी व हडपसर पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे.

नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली नव्या संचालक मंडळाने तातडीने मांजरी उपबाजारातील खोतीदारांना शेतकऱ्यांचा बाजार आहे कारण सांगून मज्जाव केला, त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले खोतीदार चालक व कामगार यांच्या रोजीरोटी वर कुऱ्हाड कोसळली, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटून खोतीदारांनी निवेदन दिले पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी संचालक मंडळासोबत बैठक घेतली तेव्हा सभापती व संचालकांनी खोतीदारांना सध्या मांजरी उपबाजारात व्यवसाय करण्यास परवानगी देऊ व त्यानंतर कोरेगाव येथे खोतीदारांसाठी वेगळे मार्केट तयार करू असे आश्वासन दिले होते परंतु संचालक मंडळाचा विरोध असल्याचे कारण सांगून सभापतींनी खोतीदारांना मांजरी उपबाजारात प्रवेश देणार नसल्याचे सांगितल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले खोतीदार व संबंधित सर्व हतबल झाले आहेत, उपमुख्यमंत्र्यांना संचालक मंडळ जुमानत नसल्याने सर्व खोतीदारांनी बैठक घेऊन हवेली व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल सोमवार 15 जानेवारी पासून काढणार नसल्याचा ठराव मंजूर केला, तसेच खोतीदारांना पुन्हा उपबाजारात विक्री करण्याची परवानगी द्यावी व संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी हडपसर येथे बाळासाहेब भिसे आमरण उपोषण करणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व हडपसर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे अशी माहिती भिसे यांनी दिली. ठरावास अनुमोदन अशोक मुळीक, विलास उर्फ पप्पु शेठ मोडक, रोहित सुर्यवंशी, गणेश कामठे, साहेबराव झांबरे यांनी दिले आहे.

 

खोतीदारांचे कुटुंब व कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न ऐरणीवर…
पूर्वापार चालत आलेल्या गावगाड्यातून खोतीदार हा व्यवसाय गावोगावी चालत आहे, हवेली व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मला 40 ते 50 खोतीदार काढतात, सुमारे एक लाख पालेभाजी जुडी रोज काढली जाते, शेवाळवाडी उपबाजारात सुमारे 60 हजार जुडी विक्री होते, या व्यवसायावर खोतीदार चालक व कामगार महिला मिळून सुमारे 600 लोकांना रोजगार मिळतो, संचालक मंडळांने मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

“कष्टकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार…..
नव्या संचालक मंडळांने मनमानी पद्धतीने केवळ त्यांचा इगो जपण्यासाठी मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केला आहे, एकूण 35 वर्षांपासून आणि अकरा वर्षापासून आम्ही या बाजारात व्यवसाय करत होतो कोणताही गैरकारभार केला नाही, संचालकांनी चालविलेला मनमानी व गैरकारभार याची उच्चस्तरीय चौकशी राज्य सरकारकडून व्हावी या मागणीसाठी 26 जानेवारी पासून बेमुदत आमरण उपोषण करणार आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा परंतु मागे हटणार नाही.
बाळासाहेब भिसे
खोतीदार – आंदोलक

या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्याशी संपर्क साधला असता संचालकांनी विरोध केला असल्याने आम्ही खोतीदारांना मांजरी उपबाजारात प्रवेश देणार नाही त्यांच्यासाठी कोरेगाव येथे नवीन मार्केट लवकरच तयार करणार आहोत असे त्यांनी सांगितले.