हडपसर उड्डाणपूलाची कथा आणि व्यथा ! “बहुचर्चित उड्डाणपूल असून अडचण नसून खोळंबा…

Rokhthok Maharashtra 1 0

हडपसर (सुधीर मेथेकर)
नुकतीच कानावर बातमी आली की हडपसर येथील सोलापूर रस्त्याकडे जाणारा उड्डाणपूल काही कामासाठी पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे ! म्हणजे पुन्हा वाहतूकीचा खेळखंडोबा आणि नागरिकांचे हाल !! हे असं किती वेळा होणार ? खरं तर
हडपसर येथील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसे तीन उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यात पहिला उड्डाण पुल रेल्वेमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-सोलापूर रस्त्यावर रामटेकडी ते वैदुवाडी (किर्लोस्कर न्यूमेटिक समोर) सुमारे 35-36 वर्षांपूर्वी बांधण्यात आला, दुसरा उड्डाणपूल हडपसर गावातील उड्डाणपूल आणि त्यानंतर हडपसर – मगरपट्टा – खराडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील “टि”आकाराचा पुल ! जो कायम चर्चेत आला तो नियोजन शुन्य उड्डाणपूल म्हणून !

उपनगराचे झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे व होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हडपसर गाव ते गाडीतळ पर्यंत हा वादातीत उड्डाणपूलाचे काम हाती घेतले. सुरुवातीपासून विरोध झालेल्या या हडपसर गावातील उड्डाणपूलाचे काम कसेबसे पूर्ण झाले ते 2007च्या सुमारास. खरं तर नियोजित उड्डाणपूलाचे काम पुर्वी वाय आकाराचाच होता. परंतु अनेक अडथळे व विरोधामुळे त्यावेळी वाय या आकाराचा पुल झालाच नाही. काही राजकीय नेते व बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या स्वार्थासाठी उड्डाणपुलाची लांबी कमी केली, कालांतराने ज्यावेळी परत वाहतूक समस्या जाणवायला लागली त्यानंतर द्रविड प्राणायाम करुन पुणे-सोलापूर या उड्डाण पुलावरून सासवड कडे जाणार पुल अस्तित्वात आला. यामुळे हडपसरकरांनी सुटकेचा श्वास सोडला !
परंतु गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच या उड्डाण पुलावरून जाता येता हादरे बसत असल्याचे जाणवायला लागले आणि जेमतेम 15 वर्षांतच डागडुजीसाठी पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला अन् हडपसरकरांना पुन्हा एकदा या वाहतूक कोंडी मुळे मनस्ताप सोसायची वेळ आली आहे. आता पुन्हा या पुलावरील वाहतूक काही दिवसासाठी बंद होणार आहे !

आमदार, नगरसेवकांनी मुंबईच्या तज्ञ पथकाद्वारे पाहणी केली. यात बेअरिंगमध्ये त्रुटी आढळल्या. महापालिकेच्या दुसऱ्या तज्ञ पथकाने पुन्हा उड्डाणपुलाची पाहणी केली. यात त्यांनी उड्डाणपूल बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला होता.
हडपसर उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी एक महिन्याहून अधिक काळ उड्डाणपूल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उड्डाणपुलावरील मार्गांची वाहतूक बंद करण्यात आली होती.

खरं तर पुणे शहरात ब्रिटिशकालीन कित्येक उड्डाणपुल सुमारे शंभर वर्षांपासून अस्तित्वात आहेत, ते मजबूत आहेत असे बोलले जाते. परंतु सुमारे 21 कोटी खर्च करून तयार केलेल्या या पुलाला 15 वर्ष झाले न झाले तोच दुरुस्तीसाठी आला त्यामुळे येथील नागरिकांना कायम भिती वाटते ! हे असे कसे झाले आहे !
कुठल्याही पर्यायी मार्गाची व्यवस्था न करता उड्डाणपूलाची वाहतूक बंद केल्याने रस्त्यावर लांबलचक रांगा लागतात. वाहतूक कोंडी होऊन चाकरमान्यांना हाल सोसावे लागतात. जेथे 5-10 मि.मध्ये पोहचत तेथे सुमारे तासभर कोंडी मधून मार्ग काढावा लागतो !. यामुळे पादचाऱ्यांना आता पुन्हा समस्यांना तोंड लागते की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे.

त्याच प्रमाणे अँम्बुलन्सला सुध्दा तातडीने रस्ता पार करता येईल का ? त्यामुळे गंभीर आजारी माणसाचे हाल तर होणार नाहीत ना ! याचाही विचार करावा लागेल. हडपसरची राजकीय उदासीनता हडपसरच्या सर्वांगीण विकासाला खीळ घालणारी ठरली आहे, राजकीय मतभेद एवढे टोकाचे असतात कि निवडणुकीनंतरही केवळ एकमेकांची जिरवायची यामध्ये खर्ची जाणारा वेळ जर हडपसरच्या मूलभूत समस्या सोडविण्यात घालविला तर येथील प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होईल.
लवकरात लवकर उड्डाणपूलाचे जे काही काम असेल ते पुर्ण करून वाहतुकीसाठी चालू करावा व नागरिकांना या वाहतूक कोंडीतून सोडवावे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.