पुणे

पुण्यात पुन्हा वैष्णवीचा बळी! लग्नानंतर 8 महिन्यांत विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांवर गुन्हा

पुण्यात पुन्हा एकदा विवाहित महिलेच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लोणीकंद परिसरात राहणाऱ्या वैष्णवी जामकर या तरुणीने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांतच आपलं जीवन संपवलं. घरातच ओढणीने गळफास घेत तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांकडून पैशासाठी वारंवार छळ केला जात होता. या मानसिक त्रासाला कंटाळूनच वैष्णवीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सासू, सासरा आणि नवऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
हुंडाबंदीचा कायदा 1961 पासून अस्तित्वात असतानाही आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ आणि त्यांचे जाणारे बळी थांबत नाहीत, हा समाजासाठी मोठा प्रश्न बनला आहे.