सिंबायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्याची बाब नसून सामाजिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
पुणे, दि. १२ (जिमाका वृत्तसेवा) : सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मातृत्वाचा प्रवास प्रत्येक महिलेने भीतीतून नव्हे, तर विश्वासातून करावा. वैद्यकीय उपचारांसोबत माया, आधार, सुरक्षितता आणि सन्मानाची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘माहेरवाशीण – मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कॅम्पस, लवळे, मुळशी येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार शंकर मांडेकऱ, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. आर. रमण, प्रोव्होस्ट तथा वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर, सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, आपल्या संस्कृतीत ‘माहेर’ म्हणजे माया, आधार, सुरक्षितता, काळजी आणि ‘तू एकटी नाहीस’ हा विश्वास. गर्भावस्थेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत महिलेला वैद्यकीय उपचारांसोबत भावनिक सुरक्षितता, पोषण, विश्रांती, कुटुंबाचा आधार, सन्मान आणि आपलेपणाची गरज असते. या सर्व बाबींना एकत्र आणणारी ‘माहेरवाशीण’ ही संकल्पना असून, प्रत्येक मातेसाठी रुग्णालय हेच मातृगृह ठरावे, हा त्यामागील विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
निरोगी माता म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी कुटुंब म्हणजे सक्षम महाराष्ट्र. महिला आणि बालकांचे आरोग्य हा केवळ वैद्यकीय विषय नसून कुटुंब, समाज आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाशी निगडित विषय आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांपर्यंत मातृत्वविषयक आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आशा कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
आशा कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना ‘माहेर-दूत’ म्हणून सक्षम करण्याची संकल्पना या उपक्रमात आहे. यामुळे गर्भवती महिलांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि वेळेवर आरोग्यसेवेशी जोडण्यास मदत होईल. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या ‘कुटुंब दत्तक योजना’सारख्या समुदायाभिमुख उपक्रमांशी ‘माहेरवाशीण’ची सांगड घातल्यास भावी डॉक्टरांना महिलेकडे केवळ वैद्यकीय प्रकरण म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती, कुटुंब आणि सामाजिक वास्तव म्हणून पाहण्याची दृष्टी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महिलांच्या मातृत्व सेवेबाबत बारामतीतील महिला रुग्णालयाच्या कार्याचा संदर्भ देताना उपमुख्यमंत्री म्हणाल्या की, २०१५ मध्ये बारामतीतील महिला रुग्णालयाच्या माध्यमातून या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. बारामतीसह कर्जत-जामखेड, फलटण, अकलूज, इंदापूर, पुरंदर आणि हडपसर परिसरातील गर्भवती मातांची तपासणी, सुरक्षित प्रसूती तसेच माता-बाळाची माहेरासारखी काळजी या रुग्णालयाच्या माध्यमातून घेतली जाते.
रुग्णालयात ॲम्बुलन्ससह नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण विनामूल्य दिले जाते. १०० खाटांच्या या महिला रुग्णालयात दरमहा सुमारे ४०० प्रसूती होत असून, आतापर्यंत ४९ हजार ७७० सुखरूप प्रसूती झाल्या आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी या रुग्णालयाचा गौरव झाला आहे. सिंबायोसिसच्या पथकाने बारामतीतील या महिला रुग्णालयाला भेट देऊन तेथील कार्याची माहिती घ्यावी. या अनुभवातून ‘माहेरवाशीण’ उपक्रमाला निश्चितच मदत होईल, अशी सूचनाही त्यांनी केली.
सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात ‘माहेरवाशीण’ सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणतीही माता सुरक्षित व दर्जेदार मातृत्व सेवेपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगून श्रीमती पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
‘माहेरवाशीण’ उपक्रमाची संकल्पना डॉ. राजीव येरवडेकर यांनी मांडली आहे. प्रत्येक रुग्णालय हे गर्भवती महिलेसाठी तिच्या माहेरासारखे प्रेम, आधार आणि सुरक्षितता देणारे ठिकाण असावे, ही संकल्पना यामागे आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात येणाऱ्या महिलेकडे केवळ ‘रुग्ण’ म्हणून न पाहता माहेरी आलेली मुलगी म्हणून सन्मानाने आणि आपुलकीने पाहण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
‘माहेर अनुभव, माहेर पोषण, माहेर संस्कृती आणि माहेर बाळंतपणोत्तर काळजी’ या चार प्रमुख आधारस्तंभांवर हा उपक्रम आधारित आहे. प्रसूतीपूर्व व प्रसूतीदरम्यान आश्वासक वातावरण, संवेदनशील परिचर्या, पसंतीच्या व्यक्तीची साथ, पौष्टिक आहार, सांस्कृतिक परंपरांचा सन्मान, स्तनपान व नवजात बालकाची काळजी तसेच प्रसूतीनंतरच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन अशा माध्यमातून मातेची सर्वांगीण काळजी घेण्यात येणार आहे.
यावेळी मातृत्व व बाल आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या आरोग्यसेवकांचा तसेच ‘माहेरवाशीण’ उपक्रमाच्या लाभार्थी मातांचा सत्कार करण्यात आला. गर्भवती मातांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘माहेरवाशीण’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.





