पुणे

प्रशांत वाघमारे यांच्यावरील आरोप चुकीचे; महापालिका आयुक्तांची भेट घेऊन समर्थकांनी मांडली भूमिका

पुणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णतः चुकीचे, निराधार आणि केवळ त्यांचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत, अशी भूमिका घेत आज विविध मान्यवरांच्या शिष्टमंडळाने पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली. यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी विनंतीही आयुक्तांना करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून प्रशांत वाघमारे यांच्या संदर्भात समाजमाध्यमांतून आणि बातम्यांमधून पसरवली जाणारी माहिती ही दिशाभूल करणारी आहे. वाघमारे हे एक कर्तव्यदक्ष आणि शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला आणि प्रतिमेला धक्का लावण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केला जात असल्याचे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
याप्रसंगी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, बाळासाहेब जानराव, रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे, ॲड. मोहन वाडेकर , माजी नगरसेवक जयदेव रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘चारित्र्यहननाचा प्रयत्न खपवून घेणार नाही’
आयुक्तांशी झालेल्या चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने स्पष्ट केले की, हा संपूर्ण प्रकार केवळ एका चांगल्या अधिकाऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी रचला गेला आहे. “आम्ही सर्वजण प्रशांत वाघमारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न येता या प्रकरणाचा कायदेशीर लढा सर्वोच्च न्यायालयात लढावा,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले असून, या प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीमुळे आता प्रशांत वाघमारे यांच्या समर्थनार्थ पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी फळी उभी राहिली असल्याचे दिसून येत आहे.