केशवनगर-खराडी पुलासाठी नागरिक आक्रमक! अजित आबा घुले यांचे ठिय्या आंदोलन, 20 दिवसांचा अल्टिमेटम

Rokhthok Maharashtra 26 0

पुण्यातील केशवनगर-खराडी पुलाच्या रखडलेल्या कामाविरोधात आज नागरिकांचा संताप रस्त्यावर पाहायला मिळाला. स्थानिक नगरसेवक अजित आबा घुले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी भव्य ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला.
गेल्या अनेक वर्षांपासून केशवनगर-खराडी पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आज नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पालिका प्रशासन आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी पुलाचे काम पुढील 20 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम पूर्ण झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका नगरसेवक अजित आबा घुले यांनी मांडली.
तसेच आयुक्त, महापौर, बांधकाम विभागाचे सभापती, विद्युत विभागाचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांची संयुक्त बैठक तातडीने घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या 20 दिवसांत पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर थेट पालिका सभागृहात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजित आबा घुले यांनी दिला. “त्यासाठी मला नगरसेवक पदावरून हटवले तरी चालेल, पण नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.