नमस्कार, पुण्यात अन्न भेसळीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासनाने पुरंदर, वडगावशेरी आणि शिरूर येथे धडक मोहिम राबवली.
पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर तब्बल ५ हजार ७०० किलो सडलेले आणि हलक्या दर्जाचे आंबे नष्ट करण्यात आले. याची किंमत सुमारे २ लाख ८५ हजार रुपये आहे. याशिवाय भेसळीच्या संशयावरून २ हजार ४३१ किलो आंबा पल्पही जप्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे, हापूस आमरसाचा मोठा साठाही जप्त करण्यात आला असून संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
वडगावशेरीतील एका डेअरीमधील पेढे खाल्ल्यानंतर अन्नबाधा झाल्याची तक्रार आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करत नमुने तपासणीसाठी पाठवले आणि दुकानाचा परवाना निलंबित केला.
तर शिरूर तालुक्यातील पाबळ येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून दीड लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे
पुण्यात FDA ची धडक कारवाई! हजारो किलो आंबे नष्ट, डेअरीचा परवाना रद्द
