पुणे

अनधिकृत बांधकाम प्रकरणात 10 नगरसेवक चौकशीच्या फेऱ्यात | पद धोक्यात?

पुणे महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अनधिकृत बांधकामांच्या आरोपांमुळे तब्बल १० नगरसेवक चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून, त्यांचे नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत निवडणूक कार्यालयाने शहर अभियंता विभागाकडून संबंधित नगरसेवकांच्या मालमत्तांची तपासणी केली. प्राथमिक अहवालात काही नगरसेवकांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात रेखा टिंगरे, वैशाली बनकर, सुरेखा कवडे, व्यंकोजी खोपडे, शीतल सावंत, काशिफ फखरूल हसन अली सय्यद, संगीता दांगट, स्मिता कोंढरे, प्राची आल्हाट आणि नंदा आबनावे या दहा नगरसेवकांची नावे समोर आली आहेत.
यापैकी पाच नगरसेवकांची प्रकरणे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे अंतिम सुनावणीसाठी पाठवण्यात आली आहेत. चार नगरसेवकांची पहिली सुनावणी पूर्ण झाली असून, काहींनी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. उर्वरित प्रकरणांचा अंतिम अहवाल शहर अभियंता कार्यालयाकडून आल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.
या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित नगरसेवकांचे पद रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या राजकारणात या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.