पुणे

पुण्यातील हायटेक सोसायटीत चोरी! अमनोरा पार्कमध्ये दागिने लंपास

पुण्यातील हडपसरमधील अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमनोरा पार्क टाऊनशिपमध्ये धक्कादायक घरफोडीची घटना घडली आहे.
फ्युचर टॉवरमधील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
ही घटना ४ जुलै २०२६ रोजी घडली. फिर्यादी अ‍ॅड. प्रमोद कुमार डोकानिया यांच्या फ्लॅटचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे, घरातील इतर सामानाला हात न लावता थेट मास्टर बेडरुममधील कपाटातून मौल्यवान दागिने चोरी करून आरोपी फरार झाला.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत कांईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
चोवीस तास सुरक्षा व्यवस्था आणि कडक प्रवेश नियंत्रण असलेल्या अमनोरा पार्कमध्येच चोरी झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.