पुणे

पत्नीला भेटायला गेला अन् रक्तबंबाळ झाला! मेव्हण्याच्या हल्ल्यात जावयाचे नाक फ्रॅक्चर

पुण्यातील कोंढवा परिसरात कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी सासरी गेलेल्या जावयावर मेव्हण्यासह सासरच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात जावयाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
ही घटना कोंढव्यातील मिठानगर परिसरात घडली. तक्रारदार रिझवान राजअहमद शेख हे पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी सासरी गेले होते. त्यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून सासरच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
रिझवान तेथून निघून आल्यानंतर आरोपींकडून त्यांना पुन्हा फोनवर शिवीगाळ करण्यात आली. याचा जाब विचारण्यासाठी ते पुन्हा सासरी गेले असता, मेव्हणा मोईन अकबर खान याने हातातील लायटरने त्यांच्या नाकावर आणि डोक्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या हल्ल्यात रिझवान यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अकबर खान, अकबर युसूफ खान आणि मोईन अकबर खान यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.