स्विफ्ट कारची हौस अन् थेट तुरुंगाची वाट!
पुण्यात मारुती स्विफ्ट कार घेण्याची हौस दोन तरुणांना थेट गुन्हेगारीच्या रस्त्यावर घेऊन गेली. महागड्या दुचाकी चोरून कार खरेदीसाठी पैसे जमवण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शेळके आणि करण धुमाळ या दोघांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून बुलेट, केटीएमसह अनेक महागड्या दुचाकी चोरल्याचा आरोप आहे.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करत १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून ८ मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे ५ लाख रुपये असल्याचे सांगितले आहे.
प्राथमिक चौकशीत स्विफ्ट कार खरेदीसाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशाने चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.





