पुण्याची जागतिक विक्रमात नोंद! दापोडीत सापडला जगातील सर्वात लांब कवड्या साप
पुण्यातून प्राणिजगताला थक्क करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. दापोडी परिसरातून रेस्क्यू करण्यात आलेल्या कॉमन इंडियन वुल्फ स्नेक, म्हणजेच बिनविषारी कवड्या सापाने जागतिक विक्रम नोंदवल्याचा दावा करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच.डी. संशोधक महेश बिलासकर यांनी १० मार्च २०२६ रोजी हा साप सुरक्षितपणे रेस्क्यू केला होता. तपासणीत या सापाची लांबी तब्बल १०२१ मिलीमीटर, म्हणजेच १.०२१ मीटर असल्याचे आढळले.
वैज्ञानिक नोंदीनुसार, यापूर्वी या प्रजातीच्या सापाची कमाल नोंदलेली लांबी ९५० मिलीमीटर होती. त्यामुळे दापोडीत सापडलेल्या या सापाने तो विक्रम मोडल्याचे सांगितले जात आहे.
या संशोधनाला “हर्पिटॉलॉजी नोट्स” या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात स्थान मिळाले असून, आवश्यक वैज्ञानिक नोंदी पूर्ण झाल्यानंतर या सापाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले आहे.





