सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटींची चोरी; 24 वर्षांपासून काम करणारा नोकर अटकेत.
मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळीतील घरातून तब्बल 2 कोटी 65 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.
या प्रकरणी प्रवीण रमेश सोलंकी (वय 45) याला अटक करण्यात आली असून, तो गेल्या 24 वर्षांपासून अहिर यांच्या घरात काम करत होता. न्यायालयाने आरोपीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान आरोपीने चोरीचा माल विकून पैसे साथीदारांमध्ये वाटल्याची कबुली दिली आहे. मात्र, आरोपीच्या वकिलांनी हे आरोप फेटाळत त्यांच्या अशिलाला खोटे गोवण्यात आल्याचा दावा केला आहे.
तपासादरम्यान शॉर्टसर्किटनंतर झालेल्या कथित रोकड चोरीचा, CCTV फुटेजमध्ये फेरफार झाल्याचा तसेच इतर संशयास्पद बाबींचाही तपास सुरू आहे. चोरीतील इतर आरोपी आणि चोरीचा माल शोधण्याचे काम गुन्हे शाखेकडून सुरू आहे.





