श्रीरामपूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! बोनेटवर सासू, भरधाव कार चालवत जावई; नागरिकांनी वाचवला जीव

Rokhthok Maharashtra 9 0

श्रीरामपूरमध्ये अक्षरशः चित्रपटालाही लाजवेल असा हायव्होल्टेज ड्रामा घडला. प्रेमविवाह केलेल्या जावयाने स्वतःच्या सासूला कारच्या बोनेटवर घेऊनच भरधाव कार चालवल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

राहुरी तालुक्यातील तरुणाने तीन महिन्यांपूर्वी श्रीरामपूरच्या तरुणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. न्यायालयीन कामासाठी दोघे श्रीरामपूर न्यायालयात आले असताना मुलीचे आई, भाऊ आणि नातेवाईक तेथे पोहोचले. यानंतर वाद सुरू झाला.
गोंधळ वाढताच तरुणाने कार सुरू केली. मात्र मुलीच्या आईने थेट कारच्या बोनेटवर उडी घेतली. तरीही जावयाने कार न थांबवता सय्यदबाबा चौकाच्या दिशेने भरधाव नेली.
दरम्यान, दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या मेहुण्याने कारच्या पुढील काचेवर दगड मारला. स्थानिक नागरिकांनीही प्रसंगावधान राखत वाहने आडवी लावून कार थांबवली आणि मोठा अनर्थ टळला.
यानंतर हे प्रकरण श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. तरुणाने सासूविरोधात तक्रार देण्यास नकार दिला, तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत दोन्ही कुटुंबांची समजूत काढली. सज्ञान मुलगा-मुलीचा विवाह कायदेशीर असल्याने हे वास्तव स्वीकारण्याचा सल्ला देण्यात आला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.