‘पोलिस’ असल्याची बतावणी करत अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण? लोहगावमधील घटनेने खळबळ.

Rokhthok Maharashtra 37 0

एकीकडे ‘आय लव्ह यू, पुणे पोलिस’ म्हणत पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक होत असताना, लोहगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला पोलिस असल्याचे सांगत १७ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा विद्यार्थी मोपेडवरून घरी जात असताना डी. वाय. पाटील चौकाजवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा शिडकावा समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारावर उडाला. विद्यार्थ्याने तत्काळ माफी मागून पुढे निघाला.
मात्र, काही अंतरावर संबंधित व्यक्तीने विद्यार्थ्याचा पाठलाग करत त्याचा रस्ता अडवला. त्यानंतर शिवीगाळ करत विद्यार्थ्याला कानशिलात लगावून चेहऱ्यावर ठोसे मारल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करत पोलिस ठाण्यात नेण्याची आणि गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांनी लोहगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीच्या दुचाकीवर ‘पोलिस’ असा लोगो असल्याचेही सांगण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला असून, संबंधित व्यक्ती खरोखरच पोलिस कर्मचारी आहे की तोतया, याचा तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.