सरकारी नोकरीचे आमिष… तरुणाची ₹70 लाखांची फसवणूक!

Rokhthok Maharashtra 10 0

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-२ पथकाने ही कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के, राजमुद्रा असलेली बनावट शासकीय लेटरहेड आणि इतर महत्त्वाचे बनावट दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपी सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या रॅकेटचे धागेदोरे राज्यभर पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, आणखी काही आरोपी आणि फसवणुकीची प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारी नोकरीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही शंका असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.