धीरज परदेशीच्या मृत्यूनंतर अहिल्यानगर बंद! आंदोलन, तणाव अन् मनपा कर्मचारी बेमुदत संपावर

Rokhthok Maharashtra 30 0

अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशीच्या मृत्यूनंतर तणाव! शहर बंद, आंदोलन; मनपा कर्मचारी बेमुदत संपावर
अहिल्यानगर शहरात धीरज परदेशी या तरुणाच्या मृत्यूनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुकुंदनगर परिसरात टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांचा तीन दिवस उपचार घेतल्यानंतर आज मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समोर येताच सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या देत शहर बंदची हाक दिली आणि बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यात आली.
दरम्यान, आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जुन्या बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले.
धीरज यांच्या पत्नीने ‘ज्या ठिकाणी माझ्या पतीला मारहाण झाली, त्याच कबरस्तानात त्यांचा अंत्यविधी करणार’, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या प्रकरणात युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या चौघांना अटक करण्यात आली आहे. मात्र हल्ल्याचे नेमके कारण काय, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत वस्तुस्थिती लपवली जात असल्याचा आरोप केला आहे. तर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
दरम्यान, धीरज परदेशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी संघटनेने सोमवारपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे.
अहिल्यानगरमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.