‘रतन टाटा सांगतायत म्हणजे खरं!’ पुण्यातील महिलेने विश्वास ठेवला अन् ४.०९ लाख गमावले
‘रतन टाटा सांगतायत म्हणजे खरं असेल!’ पुण्यातील महिलेची ४ लाखांची फसवणूक
पुण्यात सोशल मीडियावरील एका बनावट व्हिडिओवर विश्वास ठेवणे एका ३८ वर्षीय महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.
आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या या महिलेने Instagram वर दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा Deepfake व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करून कमी कालावधीत मोठा नफा मिळवता येतो, असा दावा करण्यात आला होता.
रतन टाटा यांचा व्हिडिओ पाहिल्याने महिलेचा त्यावर विश्वास बसला. व्हिडिओसोबतच्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तिला एक ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आलं.
त्यानंतर ‘मनमोहन’ नावाच्या व्यक्तीने Microsoft Teams द्वारे संपर्क साधला आणि शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं.
महिलेने आरोपीने दिलेल्या वेगवेगळ्या UPI ID आणि बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने तब्बल ४ लाख ९ हजार १०० रुपये जमा केले.
मात्र पैसे भरल्यानंतर ना नफा मिळाला, ना आरोपीचा संपर्क राहिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
महत्त्वाचं म्हणजे—सोशल मीडियावर सेलिब्रिटी किंवा उद्योगपतींचा व्हिडिओ दिसला म्हणून तो खरा असेलच असं नाही. Deepfake च्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी खात्री करा आणि कोणत्याही अनोळखी खात्यावर पैसे पाठवू नका.





