गुटखा तस्करीच्या भरधाव कारची दुचाकीला धडक; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, कारमधून अडीच लाखांचा गुटखा जप्त
कोल्हापूरच्या पुणे-बंगळूर महामार्गावर गुटखा तस्करी करणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत एका २५ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वल्लभ संजय माने, राहणार भादोले, तालुका हातकणंगले असे मृत तरुणाचे नाव आहे.
शिरोली औद्योगिक वसाहतीतील बालभारती इमारतीसमोर मंगळवारी मध्यरात्री सुमारे तीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वल्लभ माने यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, २२ लाख रुपयांच्या कारसह एकूण सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
गुटखा तस्करी सुरू असतानाच झालेल्या या अपघाताने एकाचा बळी गेल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड करत आहेत.





