स्टार हेल्थच्या हडपसर शाखेत मोठी कारवाई! विजय मिश्रा यांची हकालपट्टी; आर्थिक गैरव्यवहार, लैंगिक छळाचे आरोप

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातील हडपसर परिसरातून विमा क्षेत्राला हादरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सच्या हडपसर शाखेतील वरिष्ठ अधिकारी विजय मिश्रा यांच्यावर कंपनीकडून सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आर्थिक गैरव्यवहार, बनावट बिलांद्वारे फसवणूक, एजंट्सच्या निधीचा गैरवापर आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचे आरोप अशा गंभीर बाबींच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या दक्षता पथकाने चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टार हेल्थच्या हडपसर शाखेत कंपनीच्या अंतर्गत शिस्तभंग आणि आर्थिक व्यवहारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यालयाच्या Vigilance Team कडून चौकशी करण्यात आली.
या चौकशीनंतर हडपसर शाखेतील वरिष्ठ अधिकारी विजय मिश्रा यांच्यावर Terminationची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणाला न्यायालयीन वादाचीही पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. हडपसर शाखेचे माजी शाखा व्यवस्थापक विजय भोर यांनी विजय मिश्रा यांच्या विरोधात पुण्यातील फौजदारी तसेच कामगार न्यायालयात विविध प्रकरणे दाखल केल्याची माहिती आहे.
याशिवाय, शाखेतील काही माजी सेल्स मॅनेजर्सनीही मिश्रा यांच्या विरोधात तक्रारी केल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे काही सेल्स मॅनेजर्सवरही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. स्टार एजंट्सच्या बदल्यांमध्ये आर्थिक लाभासाठी अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. संबंधित सेल्स मॅनेजर्सची अंतर्गत चौकशी अद्याप प्रलंबित असल्याचे समजते.
विजय मिश्रा यांच्यावर कंपनीच्या निधीचा आणि एजंट्सच्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचे, तसेच बनावट बिलांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाचे आरोप देखील या प्रकरणात करण्यात आले आहेत. या आरोपांची सत्यता आणि त्याबाबतची कायदेशीर स्थिती संबंधित चौकशी व न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.
कंपनीच्या अंतर्गत चौकशीच्या अहवालानंतर प्रशासनाने विजय मिश्रा यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केल्याची माहिती आहे.
मात्र, इतर सेल्स मॅनेजर्सवरील आरोपांची चौकशी अद्याप प्रलंबित असल्याने या प्रकरणात पुढे आणखी कोणावर कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हडपसरमधील विमा कंपनीच्या शाखेत झालेल्या या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र, आरोप सिद्ध होईपर्यंत संबंधित सर्व व्यक्तींना कायदेशीरदृष्ट्या निर्दोष मानले जाते. या प्रकरणात कंपनीकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत भूमिका समोर येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.