TAFE EPD कंपनीत कंत्राटी कामगारांचा एल्गार; मनसे युनियनचा आंदोलनाचा इशारा!

Rokhthok Maharashtra 7 0

खालुंब्रे चाकण MIDC मधील “टेफ ईपीडी” कंपनीत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरून वातावरण तापलं आहे. कंपनीच्या कोअर प्रोडक्शनमध्ये कंत्राटदारामार्फत कामगारांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे. तसेच, या कामगारांना मनमानी पद्धतीने वागणूक देऊन कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही कामावरून कमी केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कंत्राटी कामगारांनी एकत्र येत मनसेची युनियन स्थापन केली आहे. कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी युनियनच्या माध्यमातून करण्यात आली.
मात्र, कामगारांच्या प्रश्नांवर थेट चर्चा करण्याऐवजी व्यवस्थापनाने पोलिस अधिकाऱ्यांना समोर करून कामगारांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युनियनकडून करण्यात आला आहे.
यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन आणि कामगारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कोणत्याही कामगाराला बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्यास मनसेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यवस्थापनाला देण्यात आला.
दरम्यान, कंत्राटी कामगारांच्या हक्कांचा आणि रोजगाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, व्यवस्थापन या प्रकरणात काय भूमिका घेणार आणि कामगारांच्या मागण्यांवर कोणता तोडगा निघणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.