एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! NCMC कार्ड आता अनिवार्य

Rokhthok Maharashtra 7 0

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. महामंडळाकडून देण्यात येणारे NCMC कार्ड ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य करण्यात आले आहे. महामंडळाच्या वाहतूक विभागाने यासंदर्भात सर्व विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

NCMC कार्ड म्हणजे काय?
एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. या सवलतधारक तसेच विनासवलतधारक प्रवाशांना NCMC कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कार्डच्या नोंदणी आणि वितरणासाठी ई-टिकिट्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या NCMC कार्डची नोंदणी व वितरणाची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांनाही NCMC कार्ड देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या सूचनेनुसार, १ सप्टेंबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला लाभार्थी प्रवाशांना सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासोबतच एसटी वाहकांनी NCMC कार्डचे Top-up देखील करून देणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रक्रियेसाठी मानक कार्यप्रणाली अर्थात SOP संबंधित विभागांना पाठवण्यात आली आहे.महामंडळाने आपल्या अखत्यारित येणाऱ्या सर्व आगार व्यवस्थापकांना या निर्णयाची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगारातील सर्व चालक, वाहक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी NCMC कार्डची नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच, १ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासामध्ये NCMC कार्डला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, प्रवाशांनी या नव्या व्यवस्थेची नोंद घ्यावी.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.