नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील सावरकर प्रकरणाच्या उल्लेखापासून अंदमानातील पुतळा उद्घाटनापर्यंत विविध मुद्द्यांवर न्यायालयात प्रश्नोत्तर.

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे-पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री. अमोल श्रीराम शिंदे यांच्या न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्याविरुद्ध स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित बदनामीप्रकरणी सुरू असलेल्या फौजदारी खटल्यात आज फिर्यादी सात्त्यकी सावरकर यांचा उलट तपास राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी घेतला.
उलट तपासादरम्यान सात्त्यकी सावरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खटल्याचा संसदेत भाषणात उल्लेख केला होता, हे मान्य केले. तसेच दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी अंदमान येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले, हेही त्यांनी मान्य केले. सदर कार्यक्रमासाठी त्यांच्या कुटुंबातील कोणाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इतर क्रांतिकारकांना चिथावणी देऊन गुन्हा घडवून आणत असा आरोप होता, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सात्त्यकी सावरकर यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांच्या हत्येबाबतही उलट तपासात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. महात्मा गांधींची हत्या ही वैचारिक व राजकीय पार्श्वभूमीवर झालेली हत्या होती, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सात्त्यकी सावरकर यांनी सांगितले. मात्र, महात्मा गांधी हे राजकीय व सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असताना कटकारस्थान करून त्यांची हत्या करणे हे गंभीर व हिंसक कृत्य असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच महात्मा गांधींच्या हत्येला स्वातंत्र्यानंतरचा पहिला दहशतवादी हल्ला मानता येईल का, याबाबत आपण काही सांगू शकत नसल्याचे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे आजोबा गोपाळ गोडसे यांनी काही पुस्तके लिहिल्याचेही सात्त्विकी सावरकर यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर ॲड. मिलिंद पवार यांनी गोपाळ गोडसे यांच्या मुलाखतींचे तीन चित्रफिती/व्हिडिओ न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सदर मुलाखतींमध्ये आलेले शब्दांकन/मजकूर मुलाखतीमध्ये व्यक्त करण्यात आला असल्याचे सात्त्यकी सावरकर यांनी मान्य केले.
उलट तपासादरम्यान फिर्यादी सात्त्यकी सावरकर यांच्या वतीने त्यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी काही प्रश्नांवर आक्षेप नोंदविले. सदर आक्षेपांचा निर्णय अंतिम निकालाच्या वेळी घेण्यात येईल, असे न्यायालयाने आदेशित केले.
या खटल्यात राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांना ॲड हर्षवर्धन पवार, ॲड. ज्ञानेश्वरी जाधव, ॲड. सुयोग गायकवाड आणि ॲड कैलास जिरे हे न्यायालयीन कामकाजात मदत करीत आहेत.
न्यायालयीन इतर कामकाजामुळे आजचा उलट तपास पूर्ण होऊ शकला नाही. पुढील उलट तपास दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.