हडपसरमध्ये हल्लाबोल मोर्चा! सरकारी हॉस्पिटल अन् भाजी मंडईसाठी आंदोलन
पुण्यातील हडपसरमध्ये नागरिकांच्या आरोग्य आणि रोजीरोटीच्या प्रश्नावरून आंदोलनाचा आवाज आता आणखी तीव्र झाला आहे. सरकारी हॉस्पिटल आणि भाजी मंडईच्या मागणीसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
हडपसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्य आणि रोजीरोटीशी संबंधित प्रश्नांसाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. हडपसरमध्ये गरिबांसाठी सुसज्ज १०० बेड्चे सरकारी हॉस्पिटल उभारावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
उपचारासाठी नागरिकांना दूरवर जावे लागू नये, हडपसर परिसरातील गरजू नागरिकांना स्थानिक पातळीवरच आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकारी हॉस्पिटल झालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली.
यावेळी आरोग्यदूत निनाद टेमगिरे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला.
“गरिबांच्या मुलांना उपचारासाठी वणवण भटकावं लागू नये. हडपसरमध्ये सरकारी हॉस्पिटल झालंच पाहिजे. आरोग्य हा अधिकार आहे, उपकार नाही,” असा आवाज त्यांनी बुलंद केला.
त्याचबरोबर हडपसरमधील भाजी विक्रेत्यांसाठी हक्काची आणि नियोजित जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. भाजी विक्रेते अतिक्रमणकारी नसून कष्टकरी आहेत, त्यामुळे त्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा मिळाली पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
मोर्चादरम्यान “हल्ला बोल! हल्ला बोल! अन्याय करणाऱ्यांवर हल्ला बोल! हडपसरच्या हक्कांसाठी हल्ला बोल!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
हा मोर्चा कुणाच्या विरोधात नसून जनतेच्या हक्कासाठी असल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले. “आवाज दाबता येईल, पण जनतेचा हक्क दाबता येणार नाही. जनता एकवटली आहे; आता हक्क मिळेपर्यंत लढाई थांबणार नाही,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत आणि संबंधित अधिकारी प्रत्यक्ष येऊन आंदोलकांशी चर्चा करेपर्यंत हल्लाबोल आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा निनाद टेमगिरे यांनी दिला. प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा निनाद टेमगिरे यांनी दिला आहे.
या आंदोलनाला बंडू सोनवणे, विद्या वारे, अजिनाथ भोईटे, महेश सुतार, सुहास गायकवाड, गुलाब सय्यद, विजय मधुकर आणि बब्बू बागवान यांच्यासह महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता हडपसरमधील सरकारी हॉस्पिटल आणि भाजी मंडईच्या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेणार? आंदोलकांशी चर्चा करून तोडगा निघणार का? याकडे हडपसरकरांचे लक्ष लागले आहे.





