राखीच्या धाग्यात गुंफला ‘खाकी’तील भगिनीभाव!

Rokhthok Maharashtra 6 0

आर. बी. जी फाउंडेशनच्या ‘तुम्ही रक्षणकर्त्या’ उपक्रमातून कर्तव्याला छोट्या बहिणींकडून आपुलकीची सलामी

 शहराच्या सुरक्षेसाठी खाकी वर्दीत सदैव दक्ष असणाऱ्या महिला पोलिसांच्या मनगटावर शुक्रवारी छोट्या बहिणींनी राखी बांधली आणि पोलीस आयुक्तालयातील वातावरण काही क्षणांसाठी भावूक झाले. एरवी नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या या ‘पोलीसताईं’ना शालेय विद्यार्थिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. महिला पोलिसांनीही छोट्या बहिणींच्या सुरक्षिततेचे अभिवचन दिल्याने रक्षाबंधनाच्या नात्याला सामाजिक जाणिवेची नवी वीण मिळाली.

आर. बी. जी. फाऊंडेशन, नवी मुंबई यांच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात ‘तुम्ही रक्षणकर्त्या’ या विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. मधुरा गेठे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात एकाच शाळेतील मैत्रिणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींनी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपुलकीने राख्या बांधत त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.

सण-उत्सव असो, आपत्कालीन परिस्थिती असो किंवा कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान… महिला पोलीस आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर तैनात असतात. समाजाच्या रक्षणासाठी अविरत सेवा देणाऱ्या या पोलीस भगिनींप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि नव्या पिढीमध्ये त्यांच्या कार्याविषयी आदर निर्माण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

राखी बांधताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर पोलीसताईंविषयीचा आदर आणि कुतूहल दिसत होते. त्यांच्या निरागस संवादाने महिला पोलिसांनाही सुखद भावनिक अनुभव मिळाला. राखीचा एक धागा छोट्या बहिणींच्या विश्वासाचा होता; तर दुसरा धागा त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याच्या पोलीस भगिनींच्या आश्वासनाचा होता.

“आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असणाऱ्या महिला पोलिसांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थिनी आणि महिला पोलिसांमधील भगिनीभाव अधिक दृढ व्हावा, हीच यामागील भावना आहे,” असे मधुरा गेठे यांनी सांगितले.

रक्षाबंधनाचा सण केवळ पारंपरिक नात्यापुरता मर्यादित न ठेवता, समाजाचे रक्षण करणाऱ्या महिलांशी आपुलकीचे नाते जोडणारा ‘तुम्ही रक्षणकर्त्या’ हा उपक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.