आईच्या प्रियकराचा कोयत्याने खून!

Rokhthok Maharashtra 12 0

कराड तालुक्यातील मलकापूर येथील लाहोटी नगर परिसरात आईच्या प्रियकराची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणात सुनील नाथा चव्हाण रा. चाफळ, ता. कराड यांचा मृत्यू झाला आहे.
आईसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून मुलाने मित्राच्या मदतीने हा हल्ला केल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सुरज दीपक चव्हाण आणि त्याचा मित्र अक्षय सुरेश म्हेत्रे, रा. कोरेगाव, या दोघांना पोलिसांनी सातारा येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरजच्या आईचे सुनील चव्हाण यांच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हे संबंध सुरजला खटकत होते. रविवारी रात्री सुरज आणि अक्षय कराडमध्ये आले. रात्री सुमारे एक वाजता सुनील कामावरून बाहेर पडताच दोघांनी त्यांना लाहोटी नगर परिसरात अडवून डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सुनील यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर दोघे साताऱ्याच्या दिशेने पसार झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि डीबी पथकाने तपासाची चक्रे फिरवत दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कोयता आणि चारचाकी वाहनही हस्तगत केले आहे. पुढील तपास कराड शहर पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.