*खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे काम वेगात!*

Rokhthok Maharashtra 9 0

पुण्यातील महत्त्वाकांक्षी खडकवासला धरण–फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, वर्षभरात सुमारे 5 किलोमीटर बोगद्याची खोदाई पूर्ण झाली आहे. खडकवासला, धायरी, कात्रज, वडाचीवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी आणि लोणी काळभोर अशा सात ठिकाणांहून एकाच वेळी खोदाई सुरू आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, प्रस्तावित 23 किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी सुमारे 5 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, खोदाईसाठी चार बूमर मशिनचा वापर करण्यात येत आहे.
सध्या खडकवासला धरणातील पाणी खुल्या कालव्याद्वारे पुढे नेले जाते. त्यामुळे पाणीगळती, बाष्पीभवन आणि जलप्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची हानी होते. बोगदा पूर्ण झाल्यानंतर या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत.
या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत अपेक्षित आहे. तसेच बचत होणाऱ्या पाण्यातून अतिरिक्त 3 हजार 472 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे.
या बोगद्याची लांबी 23 किलोमीटर, व्यास 6.3 मीटर असून तो ‘डी’ आकाराचा असेल. त्यातून प्रतिसेकंद सुमारे 41 घनमीटर पाणी वाहून नेता येणार आहे. विशेष म्हणजे, खडकवासला धरणातून फुरसुंगीपर्यंत पाणी कोणत्याही उपशाशिवाय गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पोहोचविले जाणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.