जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कोल्हापुरात शिक्षकांचा महामोर्चा; मंगेश चिवटे यांचा पाठिंबा
कोल्हापूर : राज्यभरातील शिक्षकांची प्रमुख मागणी असलेल्या जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्ववत लागू करण्यासाठी कोल्हापूर शहरात शिक्षकांचा भव्य महामोर्चा काढण्यात आला.
शिक्षक बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. हातावर काळ्या फिती बांधून आणि विविध मागण्यांचे फलक हातात घेत शिक्षकांनी शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवला.
जुनी पेन्शन योजना ही शिक्षकांच्या भविष्याची आणि सामाजिक सुरक्षेची महत्त्वाची बाब असून ती पूर्ववत लागू झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी शिक्षकांनी मांडली.
या आंदोलनाला पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी विशेष उपस्थिती लावत पाठिंबा दर्शविला. शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी खंबीरपणे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

“शिक्षकांचे हे आंदोलन केवळ हक्कासाठी नसून त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी आहे. शिक्षक बांधवांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे,” अशी भूमिका मंगेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केली.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचा हा एल्गार आता शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





