भगवानगडावर ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया भरत गिते यांनी घेतली महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराजांची सदिच्छा भेट

Rokhthok Maharashtra 5 0

पुणे/भगवानगड : उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे आणि ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित असलेले तौरल इंडिया ग्रुपचे संस्थापक भरत गिते यांनी नुकतीच भगवानगड येथे गडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग आणि व्यवसायासोबतच शिक्षण, युवकांचे भविष्य, सामाजिक बांधिलकी, अध्यात्म आणि संस्कार अशा विविध विषयांवर सखोल व प्रेरणादायी चर्चा झाली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगाने निर्माण केलेल्या संधी आणि अध्यात्माने दिलेले संस्कार यांची सांगड घालण्याची गरज असल्याचे मत या चर्चेतून अधोरेखित झाले.

या भेटीदरम्यान भगवानगडावर साकारत असलेल्या भारतातील भव्य श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची माहिती महंत नामदेव शास्त्री यांनी गिते यांना दिली. मंदिराच्या भव्य संकल्पनेपासून सुरू असलेल्या कामापर्यंतची विविध माहिती त्यांनी यावेळी सांगितली. भगवानगड ही केवळ अध्यात्माची भूमी नसून शिक्षण, संस्कार आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणूनही कार्यरत आहे. गडावर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेची, तसेच वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असलेल्या संस्थेतील कीर्तनकार विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबाबत गिते यांनी जाणून घेतले.

यावेळी नामदेव शास्त्री महाराज यांनी भरत गिते यांचा श्री संत भगवानबाबा महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. भगवानबाबांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा क्षण विशेष ठरला. या भेटीप्रसंगी भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री, तौरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक निलेश जायभाये, लेट्सअप मराठीचे इंजि. जनार्धन जायभाये, उद्योजक केशव नागरगोजे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.