जरांगेंच्या कोअर कमिटीतील संजय कटारेंना 4.90 कोटींचा दंड कायम; तहसीलदारांचा आदेश रद्द
जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई समोर आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय कटारे यांच्यावरील ४ कोटी ९० लाख ७२ हजार २०० रुपयांचा दंड कायम ठेवण्यात आला आहे.
अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी २१ सप्टेंबर रोजी आदेश काढत, कटारे यांना दंडातून वगळणारा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश रद्द केला आहे. तसेच दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रातून सुमारे २ हजार ब्रास अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १६ एप्रिल २०२३ रोजी १८ जणांवर दंडाची कारवाई झाली होती. मात्र, कटारे यांचे नाव नंतर दंडाच्या कारवाईतून वगळण्यात आले होते.
या निर्णयाविरोधातील तक्रारीनंतर नव्याने चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर कटारे यांना दंडातून वगळणारा आदेश रद्द करून गट क्रमांक २६२ वरील दंडाचा बोजा पूर्ववत करण्यात आला आहे. संबंधित तत्कालीन तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव देण्याचे निर्देशही आहेत.
या आदेशामुळे जालना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.





