दसऱ्याला आपट्याची पाने तोडाल तर सावधान! पुणे महापालिकेचा मोठा इशारा

Rokhthok Maharashtra 7 0

पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आंबा, आपटा, शमी, कांचन यांसह इतर झाडांच्या फांद्या विनापरवानगी तोडणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई होऊ शकते.
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा आहे. मात्र, या परंपरेच्या नावाखाली झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर तोडल्या जात असल्याने पुणे महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. अशोक घोरपडे यांनी नागरिकांना झाडांचे नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे.
लागू असलेल्या वृक्षसंरक्षण कायद्यानुसार विनापरवानगी वृक्षतोड करणे किंवा झाडांना नुकसान पोहोचवणे हा दंडनीय अपराध ठरू शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास झाडाच्या मूल्यांकनानुसार एक लाख रुपयांपर्यंत दंड होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दसऱ्याला आपट्याची पाने गोळा करण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडण्याऐवजी प्रतीकात्मक पर्यायांचा वापर करा. झाडांची तोड होत असल्याचे आढळल्यास महापालिकेकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
परंपरा जपा, पण निसर्गाला इजा पोहोचवू नका! पर्यावरणपूरक दसरा साजरा करा!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.