फटाक्यांच्या विक्रीवर सरसकट बंदी नाही; निर्बंध सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर.
दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, मार्ग आणि पदपथांवर फटाके फोडण्यास असलेली बंदी वर्षभर कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती गिरीश एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ध्वनी आणि वायू प्रदूषणासंदर्भातील प्रकरणाची सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरील निर्बंध केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून दिवाळीसह सर्व सण-उत्सवांदरम्यान लागू राहतील.
तसेच रुग्णालये, शाळा, न्यायालये आणि अधिसूचित शांतता क्षेत्रांमध्येही लागू नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास तक्रारींवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मात्र, फटाक्यांच्या उत्पादनावर किंवा विक्रीवर सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही. हे निर्बंध सार्वजनिक रस्ते आणि प्रतिबंधित ठिकाणी फटाके फोडण्यासंदर्भात आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
त्यामुळे दिवाळी साजरी करताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा आणि प्रदूषण टाळण्यासाठी जबाबदारीने सण साजरा करा!





