IAS रूबल अग्रवाल यांचा निर्णय पक्का; उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! विशाखा राऊत यांचे अपील फेटाळले; पालघर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आदेश कायम
मुंबई : शिवसेनेतील बंडापासून अर्थात, गेली चार-साडेचार वर्षे दिवसागणिक राजकीय धक्क्यांवर धक्के बसणाऱ्या माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिवाळीचा आणखी जबरदस्त धक्का बसला आहे. ताकदवान सत्ताधीश भाजप-शिंदेंच्या शिवसेनेसोबत दोन हात करून मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या मुंबईच्या माजी महापौर, नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रक्रियेवर कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांनी शिक्कामोर्तब केले.
अग्रवाल यांच्यावर आशा ठेवून पद वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या राऊत यांना नगरसेवकपद गमवावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्रवाल यांच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणातही राजकीय साडेसाती ठाकरेंची पाठ सोडत नसल्याचे अधोरेखित झाले आहे. राऊत यांचे नगरसेवकपद ठरविणारा आदेश अग्रवाल यांनी बुधवारी काढला. विरोधकांविरोधात रान उठविणाऱ्या राऊत यांचे पद गेल्याने महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज कमी होणार, हे नक्की आहे.
विशाखा शरद राऊत ऊर्फ विशाखा मोरेश्वर राऊत यांचे अपील फेटाळून अग्रवाल यांनी पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा २० ऑगस्ट २०२६ रोजीचा आदेश कायम ठेवला आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या या निर्णयामुळे संबंधित प्रकरणात अपीलकर्त्याला दिलासा मिळालेला नाही.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशाला आव्हान देत अपील दाखल करण्यात आले होते. मात्र, अपील प्राधिकरणाने हे आव्हान फेटाळून लावत समितीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे या प्रकरणात अपीलकर्त्याची बाजू कमकुवत ठरली आहे.
२५ दिवसांत प्रमाणपत्र जमा करण्याचे निर्देश
आदेशानुसार, संबंधित जात प्रमाणपत्र सादर केलेले नसल्यास ते आदेश प्राप्त झाल्यापासून २५ दिवसांच्या आत पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपीलकर्त्याने दाखल केलेले स्थगिती आणि अंतरिम अर्जही निकाली काढण्यात आले आहेत.
या प्रकरणात प्रिया सदानंद सरवणकर गुरव ऊर्फ प्रिया अतुल सरवणकर गुरव यांचाही प्रतिवादी म्हणून उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेतील २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशातील निर्देशांच्या अधीन राहून हा निर्णय देण्यात आल्याचे आदेशपत्रात नमूद आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का!
जात प्रमाणपत्राच्या वादात IAS रूबल अग्रवाल यांनी विशाखा राऊत यांचे अपील फेटाळून पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आदेश कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अडचणी वाढल्या असून, पक्षासाठी हा राजकीयदृष्ट्या मोठा झटका मानला जात आहे.






