महात्मा गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती.

Rokhthok Maharashtra 5 0

महात्मा गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती.

पुणे, २८ ऑक्टोबर २०२६ : पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित बदनामीच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर यांची राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून उलटतपासणी करण्यात आली.

आजच्या उलटतपासणीमध्ये सावरकरांची हिंदू समाजाच्या संघटनाविषयीची भूमिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे वैचारिक संबंध, महात्मा गांधी हत्या प्रकरणाच्या संदर्भातील न्यायमूर्ती जीवनलाल कपूर आयोगाचा अहवाल, सावरकरांच्या प्रकृतीविषयीच्या मुलाखती, तसेच गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेली बंदी अशा विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले.

उलटतपासणीदरम्यान सावरकरांनी हिंदू समाजाच्या संघटनाला हिंदुत्वाच्या संकल्पनेत महत्त्व दिले होते, या विधानाला सात्यकी सावरकर यांनी मान्यता दिल्याचे नोंदविण्यात आले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेला स्पष्ट समर्थन दिल्याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसल्याच्या विधानाशी त्यांनी असहमती दर्शवली. सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील वैचारिक साम्य आणि मतभेद यांसंदर्भातही प्रश्नोत्तर झाले.

महात्मा गांधी यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती जीवनलाल कपूर आयोगाच्या अहवालाची प्रत ॲड. पवार यांनी उलटतपासणीदरम्यान संदर्भासाठी सादर केली. संबंधित अहवालाची प्रत सात्यकी सावरकर यांना दाखविण्यात आली असता त्यांनी ती मान्य केल्याचे सांगण्यात आले.

कपूर आयोगाच्या अहवालात सावरकर आणि त्यांच्या गटाशी महात्मा गांधीच्या हत्येचा कट केल्याचा संबंधित उल्लेख आहे. सात्यकी सावरकर यांच्याकडून कपुर आयोग मान्य असल्याबाबत न्यायालयासमोर अर्ज दाखल करुन कबूल केल्याने कपूर आयोग व त्यातील निष्कर्ष न्यायालयाच्या पटलावर आले आहेत.

सावरकरांचे पुत्र विश्वास सावरकर आणि त्यांची पत्नी सुंदर सावरकर यांच्याविषयीही उलटतपासणी झाली. सुंदर सावरकर यांनी सावरकरांची अखेरपर्यंत सेवा केली, या विधानाला सात्यकी सावरकर यांनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. सावरकरांच्या प्रकृतीविषयी आणि मृत्यूविषयी सुंदर सावरकर यांनी विविध मुलाखती दिल्या होत्या का, या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

सात्यकी सावरकर यांचे ‘एक्स’ या समाजमाध्यमावर खाते असून ते नियमितपणे वापरत असल्याचे त्यांनी मान्य केल्याचे सांगण्यात आले. प्रा. डॉ. अरुण प्रकाश मिश्रा यांनी केलेल्या एका पोस्टच्या संदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

या पोस्टमध्ये नथुराम गोडसे याने बंगळुरू येथे सुंता करून घेतल्याचा आणि हातावर ‘अब्दुल्ला बेग’ असे नाव गोंदवून घेतल्याचा दावा करण्यात आल्याचे उलटतपासणीदरम्यान नमूद करण्यात आले. या दाव्यांबाबत आणि त्यामागील कथित ऐतिहासिक संदर्भांबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांची हत्या मुस्लिमांनी केली असल्याचे भासवण्याचा कट सावरकर आणि त्यांच्या सहआरोपींनी केला होता, या आशयाचा प्रश्न विचारण्यात आला असता, गांधीहत्या खटल्याचा निकाल लागलेला असल्याने अशा स्वरूपाचे प्रश्न विचारू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी सात्यकीचे वकील अ‍ॅड संग्राम कोल्हटकर यांनी हरकत नोंदविली.

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सात्यकी सावरकर यांनी होकारार्थी उत्तर देऊन या ऐतिहासिक घटनेला दुजोरा दिला. परंतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही समाजा करिता धोकादायक संघटना आहे असे कारण देऊन बंदी घातली होती का? ते मला माहीत नाही असे सांगितले.

या खटल्याच्या संदर्भात विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले. तसेच, आपला प्रकाशनाचा व्यवसाय असल्याचे आणि आपण नोकरी केलेली नसल्याचेही त्यांनी उलटतपासणी दरम्यान नमूद केल्याचे सांगण्यात आले.

न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे आजची उलटतपासणी पूर्ण होऊ शकली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ नोव्हेंबर २०२६ रो
जी होणार आहे.
ॲड. ज्ञानेश्वरी भानुदास जाधव, अ‍ॅड सुयोग गायकवाड, ॲड. कैलास जिरे ॲड. सारंग बहिरट हे मदत करित आहेत..

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.