राहुल गांधींच्या आत्मविश्वासामागे न्यायालयातील सत्यशोधनाचा लढा !! पुण्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मानहानी खटल्यातील उलटतपासणीत ॲड. मिलिंद पवार यांनी उपस्थित केले ऐतिहासिक, राजकीय आणि वैचारिक संदर्भांचे महत्त्वपूर्ण मुद्दे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच केलेल्या भाषणात आपल्याविरुद्ध देशभरात सुमारे ४५ मानहानीचे खटले सुरू असल्याचा उल्लेख केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मतचोरीच्या मुद्द्यावरून आपण सातत्याने थेट आरोप करतो; मात्र ते आपल्याविरुद्ध मानहानीचे खटले दाखल करण्यास पुढे येत नाहीत, कारण न्यायालयीन प्रक्रियेत त्यांना उत्तर द्यावे लागेल, अशा आशयाचे वक्तव्य केले.
या भाषणाच्या व्हिडिओवर सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया उमटत असताना पुण्यात सुरू असलेल्या राहुल गांधी विरुद्ध सावरकर मानहानी खटल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज असल्याचा दावा करणारे फिर्यादी सात्यकी अशोक सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली आहे. या खटल्यात राहुल गांधी यांच्या वतीने पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार राहुल गांधी यांची बाजू मांडत आहेत.
३१ डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेली उलटतपासणी ठरली चर्चेचा विषय-
या फौजदारी बदनामीच्या खटल्यात ३१ डिसेंबर २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज व पंतू फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी सुरू झाली. आजपर्यंतच्या उलटतपासणीत ॲड. मिलिंद पवार यांनी सावरकरांचे साहित्य, त्यांचे ऐतिहासिक लेखन, ब्रिटिश सरकारला पाठवलेली दयेची विनंतीपत्रे, हिंदुत्वाची वैचारिक भूमिका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, महात्मा गांधी हत्या प्रकरण आणि सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर आयोगाच्या अहवालासह अनेक महत्त्वपूर्ण विषय न्यायालयासमोर आणले आहेत.
उलटतपासणीत सात्यकी सावरकर यांच्याकडून काही महत्त्वाच्या बाबींवर उत्तरे आणि कबुलीजबाब न्यायालयीन रेकॉर्डवर नोंदवून घेण्यात आले आहेत.
यामध्ये सावरकरांच्या ‘गोपूजक नव्हे, गोपालक’ या विचाराशी संबंधित गाय हा उपयुक्त पशू असल्याचा संदर्भ, अंधश्रद्धेबाबत सावरकरांनी आपल्या साहित्यामध्ये केलेले विवेचन, ब्रिटिश सरकारकडे केलेल्या दयेच्या अर्जांचा इतिहास, तसेच सावरकरांच्या विविध साहित्यकृतींचा समावेश आहे.
उलटतपासणी दरम्यान नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांच्या बाबतही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. महात्मा गांधी यांची प्रार्थनेसाठी जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, नथुराम गोडसे याला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली, तर गोपाळ गोडसे याने जन्मठेपेची शिक्षा भोगली, या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ न्यायालयीन नोंदीत आला.
गोपाळ गोडसे यांनी शिक्षेनंतर पुण्यात परतल्यानंतर विविध वृत्तपत्रे, नियतकालिके आणि माध्यमांना मुलाखती दिल्या, तसेच गांधी हत्येच्या घटनेचे प्रात्यक्षिक करून दाखविल्याच्या संदर्भातही प्रश्न विचारण्यात आले.
गांधी हत्येनंतर गोपाळ गोडसे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासंबंधी आणि त्या कार्यक्रमात करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतही उलटतपासणीत प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सर्व बाबी वैयक्तिक स्वरूपाच्या असल्याचे फिर्यादीने स्पष्ट केल्याचे ॲड मिलिंद पवार यांनी सांगीतले.
विशेष म्हणजे, नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांबाबतही उलटतपासणीत प्रश्न विचारण्यात आले. या संदर्भात दोघेही संघाचे सक्रिय सदस्य होते, अशी महत्त्वपूर्ण कबुली फिर्यादीकडून न्यायालयात शपथेवर नोंदवून घेण्यात आल्याचे ॲड. मिलिंद पवार यांनी सांगितले.
महात्मा गांधी हत्या प्रकरणानंतर गोपाळ गोडसे यांच्या सुटकेनंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमातील वक्तव्यांमुळे देशभरात मोठी चर्चा निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली होती.
या आयोगाने गांधी हत्या कटासंदर्भात सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर केला. आयोगाच्या अहवालात सावरकर आणि त्यांच्या गटाच्या भूमिकेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.
बचाव पक्षाने न्यायमूर्ती कपूर आयोगाचे दोन्ही खंड न्यायालयासमोर सादर केले. फिर्यादीने या दस्तऐवजांच्या स्वीकाराबाबत हरकत घेतली नाही आणि ते न्यायालयीन रेकॉर्डवर आले. या अहवालातील निष्कर्ष, त्यामागील पुरावे आणि त्यांचे कायदेशीर महत्त्व यांचे परीक्षण होणे आवश्यक असल्याची भूमिका ॲड मिलिंद पवार यांनी घेतली आहे.
या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी बचाव पक्षाच्या उलटतपासणीला किती वेळ लागणार, याची कालमर्यादा निश्चित करावी, अशा आशयाचे अर्ज न्यायालयात दाखल केले.
तसेच आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची भावना, मानसिक त्रास आणि सुरक्षेला धोका असल्याच्या तक्रारीही त्यांनी न्यायालयासमोर मांडल्या.
मात्र, बचाव पक्षाच्या दृष्टीने उलटतपासणी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून फिर्यादीच्या दाव्यांची सत्यता, त्यामागील आधार, ऐतिहासिक संदर्भ आणि सादर केलेल्या दस्तऐवजांची विश्वासार्हता तपासण्याची अत्यंत महत्त्वाची न्यायालयीन प्रक्रिया आहे.
राहुल गांधी यांच्या अलीकडील भाषणातील वक्तव्य आणि पुणे न्यायालयातील सुरू असलेली उलटतपासणी यांचा थेट संबंध असल्याचे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य बाहेर येण्याचा विश्वास आणि आपली भूमिका न्यायालयात मांडण्याची तयारी हा लोकशाहीतील महत्त्वाचा पैलू आहे हे आता सिद्ध होत आहे.
या खटल्यात अॅड. मिलिंद पवार यांनी सावरकरांच्या साहित्यापासून ते गांधी हत्या प्रकरण, कपूर आयोग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या ऐतिहासिक संदर्भांपर्यंत अनेक मुद्द्यांची सखोल छाननी सुरू ठेवली आहे.
खटल्याची नियमित सुनावनी सुरू होण्यापूर्वीच ॲड मिलिंद पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. हा खटला समरी ट्रायल मधून समन्स ट्रायल मध्ये परावर्तित करावा. कारण या मध्ये आम्हाला राहुल गांधी यांच्या वतीने बचावा साठी अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज न्यायालयीन रेकॉर्डवर घ्यावे लागतील. तसेच सखोल उलटतपास करावा लागेल. तो अर्ज न्यायालयाने मंजूर करण्यात आला होता. त्या अनुशंघाने विस्तृत व महत्त्वपूर्ण उलटतपास न्यायालयात सुरू असल्याबाबत ॲड. पवार यांनी सांगितले.
या उलटतपासणी दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे तत्कालीन व वर्तमान राजकीय संदर्भ यांचाही उल्लेख झाल्याने या खटल्याला केवळ एका व्यक्तीच्या बदनामीच्या आरोपापुरते मर्यादित न ठेवता व्यापक ऐतिहासिक आणि वैचारिक संदर्भ प्राप्त झाले आहेत.
या उलटतपासणीच्या अनुषंगाने ॲड. मिलिंद पवार यांना अनेक वकील, कायदे अभ्यासक, राजकीय निरीक्षक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचे व कौतुकाचे संदेश येत असल्याबाबत तसेच सुप्रीम कोर्ट केसेस, लाईव्ह लाॅ, बार अॅण्ड बेंच अशा विविध कायद्याच्या बातम्या देणारे पोर्टल यांनी सकारात्मक दखल घेतली असल्याबाबत
ॲड मिलिंद पवार यांनी सांगितले.
ऐतिहासिक दस्तऐवज, साहित्य, फिर्यादीची विधाने आणि त्यांच्यातील विसंगती यांचा आधार घेत न्यायालयात प्रश्नांची मांडणी करणे, हे बचाव पक्षाच्या वकिलाचे महत्त्वाचे कौशल्य मानले जाते. ॲड. पवार यांनी या खटल्यात घेतलेल्या भूमिकेमुळे उलटतपासणीची व्याप्ती आणि त्यातील ऐतिहासिक संदर्भ विशेष चर्चेत आले आहेत.
या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही. उलटतपासणीही सुरू आहे. राहुल गांधी यांच्या भाषणाचा नेमका अर्थ, त्यामागील हेतू आणि फिर्यादीने केलेल्या बदनामीच्या आरोपांची कायदेशीर सत्यता याचा अंतिम निर्णय न्यायालयच घेणार आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट निश्चितपणे अधोरेखित होते. न्यायालयात व्यक्तिप्रतिष्ठेपेक्षा पुरावे महत्त्वाचे असतात, भावनिक दाव्यांपेक्षा दस्तऐवज महत्त्वाचे असतात आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमेपेक्षा सत्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण अधिक महत्त्वाचे असते.
राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या या खटल्यातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पुढील उलटतपासणी दिनांक ४ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे असे ॲड मिलिंद पवार यांनी सांगितले.
या खटल्यात अॅड.पवार यांना अॅड. ज्ञानेश्वरी जाधव ॲड. हर्षवर्धन पवार, अॅड. सुयोग गायकवाड हे मदत करित आहेत.





