ग्रामीण पुण्यात CNG महागला! आता प्रतिकिलो 101.50 रुपये मोजावे लागणार

Rokhthok Maharashtra 7 0

ग्रामीण पुण्यात सीएनजी महागणार! आता प्रतिकिलो 101 रुपये 50 पैसे मोजावे लागणार!
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! टोरेंट गॅस कंपनीने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरवाढीनंतर ग्रामीण पुण्यात सीएनजीचा दर आता 100 रुपये 50 पैशांवरून थेट 101 रुपये 50 पैसे प्रतिकिलो होणार आहे. ही दरवाढ 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 17 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहे.
पेट्रोल डीलर्स असोसिएशन, पुणे यांच्याकडून या दरवाढीची माहिती देण्यात आली आहे. सुधारित दर लागू करण्यासाठी टोरेंट गॅस कंपनीचे कर्मचारी संबंधित सीएनजी पंपांवर जाऊन दर बदलणार आहेत.
या दरवाढीचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक, टॅक्सी, कॅब चालक आणि खासगी वाहनधारकांना बसण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागातून पुणे शहरात दररोज ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला आता अतिरिक्त कात्री लागणार आहे.
दरम्यान, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड म्हणजेच MNGL मार्फत सीएनजी पुरवठा केला जातो. मात्र, टोरेंट गॅसची ही दरवाढ ग्रामीण पुण्यातील त्यांच्या वितरण क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या परिसरातील सीएनजी पंपावरील दर तपासूनच इंधन भरावे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.