पत्नी-मुलं घरी, बाहेर तृतीयपंथींचा वेश! मनू प्रसादची शिळफाटा रोडवर निर्घृण हत्या
घरी पत्नी आणि लेकरं… पण बाहेर तृतीयपंथींचा वेश धारण करून भिक्षा मागायचा! नवी मुंबईतील महापे-शिळफाटा रोडवर एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मनू मदन प्रसाद असं मृत तरुणाचं नाव असून, तो तुर्भे स्टोअर्स परिसरात पत्नी आणि मुलासोबत राहत होता. मात्र, तृतीयपंथी सहकाऱ्यांसोबत राहून साडी नेसून भिक्षा मागण्याचं कामही तो करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
मंगळवारी घरातून बाहेर पडलेला मनू बुधवारीही परतला नाही. त्याचा शोध सुरू असतानाच महापे-शिळफाटा रोडलगत झुडपांमध्ये त्याचा मृतदेह आढळला. मनूच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. या हत्येमागचं नेमकं कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.





