*प्राजक्ता तायडे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस; जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष! रावेरमधील कथित अवैध धंद्यांविरोधात उपोषण सुरूच; लॉजिंग व हॉटेलची सखोल तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी*

Rokhthok Maharashtra 7 0

 

रावेर | जळगाव / हमीद तडवी

रावेर तालुक्यातील कथित अवैध धंद्यांविरोधात आणि वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ दैनिक हॅलो बातमीदारच्या कार्यकारी संपादिका श्रीमती प्राजक्ता एस. तायडे यांनी रावेर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. या आंदोलनामुळे रावेर तालुक्यातील कथित अवैध व्यवसाय आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तालुक्यात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांसह काही लॉजिंग व हॉटेल व्यवसायांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. संबंधित आस्थापनांचे सीसीटीव्ही फुटेज, ग्राहक नोंदवही, परवाने तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी. तपासात नियमांचे उल्लंघन किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
*
*तक्रारी करूनही कारवाई का नाही** ?

संबंधित प्रकरणांमध्ये यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या असतानाही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी झाली का? संबंधित आस्थापनांची कागदपत्रे तपासली का? दोषींवर कारवाई करण्यात आली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

*जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करावा!*

स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत उपोषणकर्त्या प्राजक्ता तायडे यांनी आता जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. रावेर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच यापूर्वी दिलेल्या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी. कोणत्याही राजकीय दबावाला किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपाला बळी न पडता कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

*आता प्रशासन कोणती भूमिका घेणार?*

हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे, महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि कथित अवैध धंद्यांना आळा बसावा, यासाठी असल्याचे उपोषणकर्त्या प्राजक्ता एस. तायडे यांनी स्पष्ट केले आहे.

आमरण उपोषणाचा दुसरा दिवस उलटत असताना जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि प्रत्यक्षात कोणती कार्यवाही करते, याकडे आता रावेर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.