आई, मी घर सोडून जात आहे! १६ वर्षीय मुलाचा मध्यरात्री मेसेज; खराडी पोलिसांची शोधाशोध

Rokhthok Maharashtra 6 0

आई, मी घर सोडून जात आहे… पुण्यातील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मध्यरात्री घरातून पलायन! खराडी पोलिसांची शोधाशोध, मित्रांच्या सल्ल्याने आठ तासांत सुखरूप परतला घरी!
पुण्यातील खराडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या मोबाईलवर ‘आई, मी घर सोडून जात आहे’ असा मेसेज पाठवून अवघ्या १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने मध्यरात्री घर सोडले. मुलगा घरात नसल्याचे लक्षात येताच आईची घाबरगुंडी उडाली. नातेवाइकांकडे शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने अखेर आईने खराडी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली. मात्र, तपासादरम्यान वेगळीच माहिती समोर आली. हा विद्यार्थी डेहराडून येथे अकरावीच्या वर्गात शिकत असून दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा शाळेत जाण्याची त्याची इच्छा नव्हती. याच नाराजीतून त्याने घर सोडल्याचे समोर आले.
दरम्यान, मुलाच्या मित्रांनी त्याला योग्य सल्ला दिल्यानंतर त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. अखेर आठ तासांच्या शोधानंतर मुलगा सुखरूप घरी परतल्याने आई आणि नातेवाइकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मित्रांच्या समजूतदारपणामुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, मुलांच्या मनातील भावना समजून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.