मुंबई

करोना व्हायरसमुळे पुणे, पिंपरी मधील शाळा बंद ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय ; परीक्षा वेळेवर होण्याचे संकेत

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
करोना व्हायरसची गंभीरता वाढत चालली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे आणि पिंपरीमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण मुंबईमधील शाळा सुरु राहणार आहेत. दरम्यान उद्वव ठाकरे यांनी वार्षिक परीक्षेसंबंधी बोलताना सांगितलं की, ज्या परीक्षा आहेत त्या सर्व ठरलेल्या वेळेप्रमाणे पार पडणार आहेत. तसंच दहावी आणि बारावीच्या परीक्षाही ठरलेल्या वेळेत सुरु राहतील. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी परीक्षा लवकरात लवकर घेणं शक्य आहे का अशी विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “पुढील १५ दिवस जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आत्ता कुठे करोना व्हायरसची लक्षणं गांभीर्याने दिसू लागली आहेत. गंभीरता अधिक होण्याची वाट न पाहता तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे परीक्षा लवकर घेण्यापेक्षा उशिरा करण्यासंबंधी विचार सुरु आहे. शाळा आणि आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा करुन नंतर आढावा घेऊन काय निर्णय घेऊ शकतो याचा विचार करु”.

“सुदैवाने आपल्या येथून करोना व्हायरसची उत्पत्ती झालेली नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. उगाच भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईत असा निर्णय घेण्यात आलेला नाही. खासगी शाळा काही ठिकाणी स्वत:हून बंद करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये ही आपली जबाबदारी आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार असून मध्यरात्रीपासून या आदेशाची अमलबजावणी होणार आहे,” अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली. “मॉल्स, रेस्तराँ, हॉटेल आपण बंद करत नाही आहोत, पण तिथे जाणं लोकांना टाळावं,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. “सुदैवाने अजून १७ ही लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाही आहेत. आपण दक्षता घेतली तर पुढील धोका टाळू शकतो,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“रेल्वे आणि बस अत्यावश्यक सेवा असल्याने बंद करु शकत नाही. तसंच धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय तसंच क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत. अशा कार्यक्रमांसाठी सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल. खासगी कंपन्यांना शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी,” असं उद्वव ठाकरेंनी सांगितलं.

0 0 votes
Article Rating
174 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments