पुणे

महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर : प्रा. राजकुमार कदम अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

“महाराष्ट्राला संत, महापुरुषांचा विचार आणि गौरवशाली इतिहास लाभला आहे. अशी परंपरा लाभलेला महाराष्ट्र हा अद्वितीय आहे. ही परंपरा जपण्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर आहे. युवाशक्ती हीच देशाची संपत्ती आहे. या युवाशक्तीला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ करू नका. प्रतिकूल परिस्थिती हीच यशाची वाट दाखवत असते. प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करून स्वतःचा आदर्श निर्माण करा.” असे आवाहन प्रा. राजकुमार कदम यांनी केले.

 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे पिंगोरी येथे महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमाचे पहिले पुष्प प्रा. राजकुमार कदम यांनी गुंफले. त्यांनी ‘गौरवगाथा महाराष्ट्राची’ या विषयावर मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले. त्यांनी “बहि:शाल शिक्षण मंडळ म्हणजे बिनभिंतीची शाळा असून अभ्यासक्रमाबाहेरील जीवनानुभव विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून पोहोचवता येतात. अशा उपक्रमातून विद्यार्थांची बहिश्रुत्ता वाढीस लागते. यातूनच व्यक्तिमत्त्व विकास घडत असतो.” असे मत व्यक्त केले.

प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.सविता कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन लगड, डॉ. नाना झगडे, प्रा. गौरव शेलार, डॉ अंजू मुंढे, डॉ.वंदना सोनवले, प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. गणपत आवटे, प्रा. तुषार जगताप, अक्षय कोकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत जगताप या विद्यार्थ्याने केले. आभार प्रा. नितीन लगड यांनी मानले.