पुणे शहरात घरफोडीच्या घटनांनी नागरिक चिंतेत असतानाच, काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. महंमदवाडी परिसरातील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तरवडे वस्ती येथील गगेश्वर यादव यांच्या बंद घरातून ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून वैभव उर्फ बाब्या संजय गायकवाड आणि प्रशांत उर्फ चिक्या भारत कसबे या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या संशयितांनी पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या आरोपींकडून चोरीला गेलेले १५.१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २२०.६ ग्रॅम चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण २ लाख ८३ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये सोन्याचा हार, चैन, टॉप्स, चांदीचे पैंजण आणि साखळी अशा मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक विनायक गुरव आणि त्यांच्या तपास पथकाने केली आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात कौतुक होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.
