पुण्यात पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे… हांडेवाडी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १०३ गॅस सिलिंडर आणि चारचाकीसह सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररित्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार सुरू होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई करण्यात आली.
काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानाशेजारी उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात सिलिंडर साठवलेले आढळले. यावेळी एक व्यक्ती थेट घरगुती सिलिंडरमधून ५ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरताना पकडण्यात आला.
या प्रकरणी नितीन हनुमंत होळकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, अशा प्रकारच्या धोकादायक आणि बेकायदेशीर व्यवसायावर पोलिसांची नजर कायम असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
