1. पौड बसस्थानकाचा बारामतीच्या धर्तीवर कायापालट करण्याची मनसेची मागणी!

Rokhthok Maharashtra 6 0

*पौड बसस्थानकाचा बारामतीच्या धर्तीवर कायापालट करा; मनसेची शासनाकडे मागणी*

मुळशी तालुक्यातील पौड बसस्थानकाचे बारामती बसस्थानकाच्या धर्तीवर अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पौड हे पर्यटन, शिक्षण आणि औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होत असून, पुणे-कोलाड महामार्गामुळे या परिसरातील वाहतूक आणि प्रवाशांची संख्या भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पौड बसस्थानकाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करणे गरजेचे असल्याचे मनसेने म्हटले आहे.
प्रस्तावित बसस्थानकात डिजिटल टाइम-टेबल डिस्प्ले, हायटेक सीसीटीव्ही, पीएमपीएमएल आणि एसटी बसेससाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह, जलद बस पास केंद्र, तक्रार निवारण व विविध सवलत योजनांसाठी केंद्रीय कार्यालय अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी २४ तास प्राथमिक उपचार केंद्र, मोफत पिण्याचे पाणी, सुसज्ज स्वच्छतागृह आणि महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार शंकर मांडेकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना रजिस्टर पोस्ट आणि ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.