दुपारी घराबाहेर पडली, रात्रभर बेपत्ता; सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह! सोलापुरात खळबळ
दुपारी घराबाहेर पडली… रात्रभर शोध सुरू; सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह!
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
भाग्यश्री नानासाहेब गायकवाड असं मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री १६ ऑगस्ट रोजी दुपारी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र काहीही माहिती मिळाली नाही.
अखेर १७ ऑगस्ट रोजी कुंभारी-दोड्डी रस्त्यालगत त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी भाग्यश्री यांची दुचाकी पडलेली होती. त्याचबरोबर मृतदेहाजवळ एक मोठा दगडही आढळून आला आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात, याबाबत संशय निर्माण झाला आहे.
वळसंग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. भाग्यश्री घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू असून अपघातासह घातपाताच्या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.





