IAF अधिकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचाराचा आरोप! बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतर प्रकरणाने नागपूर हादरले

Rokhthok Maharashtra 3 0

नागपूरमध्ये भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि सक्तीच्या धर्मांतराचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
24 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य आरोपी अयाज ताज मदारे हा तिचा शाळेतील जुना वर्गमित्र आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये प्लॉट खरेदीच्या बहाण्याने त्याने तिच्याशी पुन्हा संपर्क साधला. त्यानंतर वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावून नशीला पदार्थ दिला आणि बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करून त्याद्वारे सतत ब्लॅकमेल केले. अनेक वेळा लैंगिक शोषण केले आणि तब्बल चार लाख रुपये उकळल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही गंभीर आरोप आहे. समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये महिला रडत “मला सोडून दे” अशी विनंती करताना दिसते, तर आरोपी तिचे हात धरून धार्मिक मंत्र म्हणताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, तिला कळमेश्वर येथे नेऊन काही धार्मिक विधी करण्यात आले आणि जबरदस्तीने “कबूल आहे” म्हणण्यास भाग पाडण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी पती घरी परतल्यानंतर महिलेने संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेलिंग, खंडणी, सक्तीचे धर्मांतर तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास यंत्रणा पडताळत असून पुढील तपास सुरू आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.